जलसंकटाची दिशा
पाण्याची वाढती समस्या:
पाणी हा पृथ्वीवरील सर्वांत मौल्यवान स्रोत आहे. परंतु, हवामान बदल, लोकसंख्येची झपाट्याने होणारी वाढ आणि अव्यवस्थित शहरीकरण यामुळे पाण्याची समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्ये पाण्याच्या टंचाईला सामोरे जात आहेत, विशेषतः उन्हाळ्यात तीव्रतेने या समस्येचा अनुभव येत चाललेला आहे.
हवामान बदलांमुळे अनियमित पाऊस:
गेल्या काही दशकांत हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप सुद्धा लक्षणीय बदलले आहे. यामुळे भारतासह महाराष्ट्रातील कृषी, जलसंपत्ती व्यवस्थापन, आणि पर्यावरणीय संतुलनावर गंभीर परिणाम होत आहेत. काही भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होते, तर इतर भागांमध्ये दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. या अनियमित पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता घटत आहे. उदा., जास्त पावसामुळे भात किंवा उसाच्या पिकाचे नुकसान तर दुष्काळामुळे सोयाबीन आणि डाळिंब पिके प्रभावित होतात.
भूजलाचा अतिवापर
भूजल हा भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. मात्र, या संसाधनाचा अतिवापर गंभीर संकट निर्माण करीत आहे. शेती, उद्योग, आणि नागरी पाणीपुरवठ्यासाठी भूजलाचा बेसुमार उपसा केला जातो आहे. परिणामस्वरूप महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात भूजल पातळीमध्ये लक्षणीयरीत्या घटली आहे. यामुळे भूजलावर अवलंबून असलेल्या विहिरी, तलाव आणि नद्या तसेच बोअरवेल कोरड्या पडत आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी कमी उत्पादन देणाऱ्या पिकांवर अवलंबून राहतात, ज्यामुळे शेती व्यवसाय संकटात सापडत चाललेला आहे.
सांडपाण्याच्या योग्य व्यवस्थापनाचा अभाव
सांडपाण्याचा योग्य व्यवस्थापन न केल्याने जलस्रोत प्रदूषित होत आहे, ज्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणीय हानी होत चाललेली आहे. भारतात अंदाजे ७०% सांडपाणी शुद्ध न करता थेट नद्यांमध्ये टाकले जाते. परिणामी नद्या आणि तलाव अशुद्ध होऊन पिण्यायोग्य पाण्याची कमतरता निर्माण होत आहे. या दूषित पाण्यामुळे कॉलरा, डायरिया, आणि जलजन्य रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर सध्या होतो आहे. मानवी जीवनासोबातच जलीय प्रजाती आणि पर्यावरणीय संतुलनावर नकारात्मक परिणाम होतो आहे.
जलसंवर्धनाचा अभाव
जलसंवर्धनाचे महत्त्व समजून सांगण्यात प्रशासकीय यंत्रणासह सामान्य लोक समजून घेण्यात अजूनही अपूर्णता आहे. पाणीटंचाईच्या समस्या वाढण्याचे हे एक मुख्य आणि महत्त्वाचे कारण आहे. पाण्याचे सुसंगत नियोजन नसल्यामुळेच कृषी आणि घरगुती पातळीवर पाण्याचा अपव्यय जास्त प्रमाणात होतोय. तसेच शहरांमध्ये अनेक भागांत पावसाचे पाणी साठवण्याची तसेच रेन वॅाटर हार्वेस्टिंग सारखी योग्य सोय नसल्याने ते गटारी, नाल्यांमध्ये वाहून जाते. नैसर्गिक जलस्रोत कमी होत आहेत, ज्यामुळे भविष्यात अजून मोठ मोठे जलसंकट निर्माण होईल यात नक्कीच शंका नाही. भूजलाचा अतिवापर, सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा अभाव, आणि जलसंवर्धनाच्या अपुरेपणामुळे जलसंकट गंभीर बनत आहे. यासाठी शासन, उद्योग, आणि सामान्य नागरिकांनी मिळून उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. जलसंपत्तीचे जतन हे आपल्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी आवश्यक आहे.
लेख : धनराज चंद्रकांत रणदिवे, नाशिक